About Me

My photo
माझा एक प्रयत्न.......लिखाणाचा

Saturday, March 10, 2012

माझे मानवी स्वप्न....

थकणार्‍या ह्या डोळ्यांनी एका स्वप्नाचे सत्यात रुपांतर होतांना पाहिले आहे,
अंधाराला संपवत स्वतःच प्रकाशाची निर्मिती करणाऱ्या त्या हातांना मी पाहिले आहे.
ह्या तंत्रांमुळे  संपूर्ण विश्वाचा माझ्या घरातला वावर मी पाहिला आहे.
ह्या संशोधनाने दुर्दम्य व्याधींना संपवत, यमाला मोकळ्या हाती परततांना मी पाहिले आहे.

आज ह्या डोळ्यांनी मी पुन्हा: एक नवे स्वप्नं पाहिले आहे.

साक्षरतेचे धडे गिरवत स्वतःचे भविष्य लिहिणारे, घरोघरात जन्माला आलेलं ते मुलं मला पाहायचं आहे.
प्रत्येकाला भरल्या पोटी, भरल्या देही स्वतःच्या झोपडीत निजतांना मला पाहायचं आहे.
माणसासाठी माणसाला झगडत, माणूसकीची नवी व्याख्या: रचतांना मला पहायची आहे.
आज ह्या मंदिरात माणसाची पूजा करणारी.......  देवांची ती रांग मला पहायची  आहे.


                   आपली शाळा......... 

                 आयुष्याची ही शाळा दररोज मोकळ्या आभाळाखाली भरते. ही शाळा आपण अनुभवलेल्या शाळेपेक्षा प्रचंड निराळी असते, कारण ह्या शाळेला चार भिंतींचे बंधन कधीच नसते. ही एकमेव अशी शाळा असते जी तुम्ही पहाटे डोळे उघड्ल्यापासून रात्री तुम्ही निजेपर्यंत चालू असते, किंबहुना रात्री स्वप्नातही ती कधी कधी दिसते.

             ह्या शाळेला शिकवण्यासाठी एक शिक्षक- असे बंधन कधीच नसते, कारण ह्या शाळेत तुम्हाला कधी एखादे लहान मुलं तर कधी परिस्थिती शिकवत असते. आणखी ह्या शाळेचे विशेष म्हणजे ह्या शाळेत इतर शाळेसारखा पहिला, दुसरा नंबर असा प्रकारच नसतो, कारण इथे प्रत्येकाचा पेपर हा वेगळा असतो, त्यामुळे comparison चा प्रश्नच नसतो.

             ह्या शाळेत सर्वप्रकारचे खेळ शिकवले जातात, जे कधी शारीरिक तर कधी मानसिक असतात- तरीदेखील ह्या खेळात कोणी किती सहभाग घ्यावा ह्याचे बंधन कोणावर कधीच नसते. ह्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज संघर्ष करावा लागतो तो वास्तव, प्रयत्न आणि स्वप्नांशी. आणि ह्या लढाईत कधी तुम्ही जिंकतात तर कधी ती लढाई.
            ही लढाईसुद्धा फार गमतीशीर असते, कारण ह्या लढाईची सुरवात अगदी छोट्या लढाईने होते आणि ती जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला मोठ्या लढाईला सामोरे जावे लागते, अशीच ही लढाई मोठी मोठी होत जाते आणि हा विद्यार्थी घडत जातो. पण जर तुम्ही त्या लढाईत हार मानली तर ती लहान लहान होत जाते आणि तुम्ही बिघडत जातात.

             ह्या शाळेला नसेलही बंधन गणवेशाचे पण ह्या शाळेची शिस्त मात्र फार कडक असते. जर तुम्ही ही शाळा प्रामाणिकपणे अनुभवली नाही तर तुमचे मनच तुम्हाला शिक्षा देते, जे तुम्हाला बैचेन करते तर कधी अस्वस्थ बनवते.

             दिवसभरात ह्या शाळेत तुम्ही निरनिराळे धडे गिरवत असतात, जे तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देत असतात. काही प्रतिभावान विद्यार्थी ह्या शाळेचे मार्गदर्शक असतात जे तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात, तर काही बंडखोर विद्यार्थी तुम्हाला अप्रत्यक्षपणे काय करू नये हे सांगत असतात.

           १६ तासांच्या ह्या शाळेत तुमचे मन कधी आनंदी होते तर कधी खिन्न: होत असते. हे बदल Munna ने सांगितल्याप्रमाणे शरीरात होणाऱ्या chemical लोच्या मुळे तर होत नसतील ना? हा बदल control करणे आपल्या हातात नसले तरी काय स्मरणात ठेवावे हे मात्र नक्कीच आपल्या हातात असते.

         आपल्या ह्या शाळेत....आपण आपलंच आत्मचरित्र लिहित असतो.
छान-छान गोष्टीनी भरलेलं हे पुस्तक खरंच खूप अमुल्य असतं.....कारण एका कळीत दडलेलं फुल ह्यात उमलेलं असतं. 

स्वप्न आणि सत्य......


आज ह्या सत्यात...... एक स्वप्न जगत  आहे.
आज ह्या अंधारात..... एक नवा सूर्य उजाडत आहे.
स्वप्न आणि सत्य  दररोज परीक्षा देत आहेत.
कधी स्वप्न तर कधी सत्य pass होत आहे.
आयुष्याची शिखरं गाठण्यासाठी गरज आहे ती,
सत्याला स्वप्न दाखवत distinction मिळवण्याची.


आजकाल मी फार चिडतो............



आजकाल मी फार चिडतो, पण स्वतःवरचा राग मी नेहमी दुसर्यावर काढतो,

माझ्याच वाटेवर एवढे काटे का? असा प्रश्न मला नेहमी पडतो , खरं तर मीच… चप्पल घालायला विसरतो.


जरा...... थांबलो असतो तर मनशांती न गमावता सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असती,

फक्त एका अंशाने अस्तित्व गमावलेला तो (पाण्याची वाफ झालेला तो थेंब )
   कदाचित............सागर निर्मितीचा साक्षीदार झाला असता.